परीक्षेच्या काळातील पालकत्व

313

नुकत्याच शिक्षण विभागाने इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंबंधी तारखा व नियोजन जाहीर केले. त्यानंतर इयत्ता दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधी अनिश्चितशी जाणवणारी धाकधूक बऱ्याच अंशी कमी झाली. विद्यार्थी व सोबत पालक देखील यावर्षी घेण्यात ‍येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेचे संबंधी साशंक होते. परीक्षा होणार तर कशा होणार? कोरोनाच्या कालावधीमधील परीक्षेचा असणारा अभ्यासक्रम, परीक्षा नियोजन व परीक्षेच्या निश्चित तारखा यासंबंधी विद्यार्थी व पालक बऱ्याच अंशी धास्तावलेला होता. परंतु शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नियोजनानुसार यावर्षी परीक्षेचे नियोजन कसे राहील, हे सांगून विद्यार्थी व पालकांची बरीचशी साशंकता दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, आता राहिलेल्या काळामध्ये विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनावर भर देऊन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास करून परीक्षेला सामोरे जायचे आहे. मग हे करत असताना एखाद्या घटकाची किंवा पाठाची उजळणी किती प्रभावीपणे करून त्या घटकाचे दृढीकरण होणे, हे महत्वाचे ठरणार आहे. हार्डवर्क करण्याऐवजी स्मार्ट वर्क करण्याला आता प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांना या परीक्षेची पूर्वतयारी मनःपूर्वक करावी लागणार आहे. हे करत असताना पालकांनी देखील तितकंच सजग राहून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयींचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. पालक म्हणून आपला मुलगा किंवा मुलगी दिवसातून किती वेळ आणि कशाप्रकारे अभ्यास करतोय आणि अभ्यास करताना विद्यार्थ्याला कशाचा ताण तर जाणवत नाही ना? विद्यार्थी किती रिलॅक्स राहून घटक समजून घेत आहे? त्या दृष्टीने तयारी करत आहे? याकडे देखील पालकांना जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे.
परीक्षेच्या कालावधीमध्ये पालकांनी किमान दिवसातून 30 मिनिटे तरी विद्यार्थ्यांशी अशाप्रकारे सहज अल्हाददायक वाटतील, अशा गप्पा गोष्टी कराव्यात.विद्यार्थ्यांना मायेचा,धीराचा व स्फूर्ती देणारा असा अल्हाददायक विश्वास निर्माण करण्यासाठी हा वेळ पालकांनी मुलांना दिला पाहिजे. आपला पाल्य अभ्यास करताना मानसिक ताण तणावाखाली तर नाही ना? याची चाचपणी पालकांनी करायला हवी. पाल्याचा मानसिक ताणतणाव समजून घेताना आपण पाल्याला तर डायरेक्ट विचारू शकत नाही की,तू कोणत्या तणावाखाली वावरत आहे? परंतु आपल्या पाल्याशी सहज साधल्या गेलेल्या संवादातून आपल्याला पाल्याच्या मनाची दुसरी बाजू जाणून घेतां येणार आहे. पाल्याला विश्वासात घेऊन जर विचारले, तर पाल्य मुलगा असो किंवा मुलगी , नक्कीच व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही. या काळात आईने मुलीची आई होण्यापेक्षा चांगली मैत्रीण कसे होता येईल, ते पाहावे. म्हणजेच काय परीक्षेतील कालावधीमध्ये जाणवणाऱ्या अडचणींना मुलींना मोकळी वाट करून देता येईल व त्या अडचणींवर आई जितक्या चांगल्या प्रकारे समाधान, उपाय शोधून काढेल ते इतर कोणालाही जमू शकणार नाही. म्हणून आईची भूमिका जवळच्या जिवलग मैत्रीण सारखी असल्यास मुलींना परीक्षा कालावधीमध्ये नक्कीच आधार वाटेल.
बऱ्याच पालकांना कामाच्या व्यस्ततेमुळे दिवसभरातून कमीतकमी वेळ पाल्यासाठी देता येईल, पण हरकत नाही.परंतु जो काही वेळ आपण आपल्या पाल्यासाठी देणार आहात तो पूर्णपणे पल्यासाठीच असावा.या काळामध्ये कोणतेही महत्वाचे काम अथवा मोबाईल कॉल्स, व्हाट्सअप किंवा इतर बाबींना समाविष्ट करू नये. केवळ त्याच्या समस्या जाणून घेऊन या समस्या फक्त ऐकून दुर्लक्षित करू नये. तर या समस्या कमी वेळात कशा चांगल्या प्रकारे आपल्याला सोडवता येतील,यासाठी देखील तात्काळ प्रयत्न करणे गरजेचे ठरणार आहे. समस्या वरवर पाहता काही अंशी जरी साध्या सोप्या वाटत असल्या परंतु मुलाच्या दृष्टीने या समस्या भविष्यकाळात गांभीर्याने न घेतल्यास गंभीर स्वरूप धारण करू शकतात.म्हणून समस्या लहान असू द्या किंवा मोठी असू द्या, ती जाणून घेऊन त्यावर उपाययोजना पालकांनी चांगल्याप्रकारे केली पाहिजे.काही समस्या जर अध्ययन अध्यापनाशी निगडित असतील तर तात्काळ वर्ग शिक्षकांशी किंवा विषयी शिक्षकांशी चर्चा करून विद्यार्थ्याला समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्या विद्यार्थ्यांचे समाधान होईपर्यंत समजावून सांगावे. म्हणजे विद्यार्थ्याला त्या विषयाची किंवा त्या विषयातील घटकाची भीती दूर होण्यास मदत होईल. पालक हा केवळ पालक नसून सर्व विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थिनीचा जवळचा ‘मित्र’जेव्हा होईल तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनावरील ताणतणाव कमी होऊन विद्यार्थी मनमोकळेपणाने व्यक्त होईल आणि परीक्षेच्या काळातील ताणतणाव विद्यार्थ्याला जाणवणार नाही. विद्यार्थ्याला अशावेळी खूप हलके हलके वाटत राहील आणि हा हलकेपणा विद्यार्थ्यांना पुढील विषयाच्या अभ्यासासाठी नक्कीच सकारात्मक ऊर्जा देणारा असेल.
परीक्षा कालावधी मध्ये बरेच पालक विद्यार्थ्यांना खेळण्यापासून दूर ठेवतात.विद्यार्थ्यांने परीक्षा कालावधीमध्ये पूर्णवेळ अभ्यास करावा, असा अट्टाहास मुळीच करू नये. विद्यार्थ्याने खेळ खेळणे म्हणजेच त्याने अभ्यासामध्ये घेतलेली विश्रांती,असे समजून आपण विद्यार्थ्याला किमान अर्धा ते एक तास त्याच्या आवडीच्या खेळामध्ये रमू द्यावे. मग तो खेळ मैदानी असू शकतो किंवा बैठे खेळ असू शकतो. उदाहरणार्थ बुद्धिबळ, कॅरम, क्रिकेट किंवा इतर खेळ यामध्ये विद्यार्थी थोडासा वेळ घालून पुन्हा अभ्यासासाठी नव्या ऊर्जेने व नव्या उत्साहाने सुरुवात करेल. म्हणजेच खेळ हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळा ठरत नसून त्याला पुढच्या अभ्यासासाठी तयार होण्यासाठी दिलेली विश्रांती, या हेतूने जर आपण पाहिले तर नक्कीच आपण विद्यार्थ्यांमध्ये नवीन चैतन्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.परंतु हा खेळ खेळताना वेळेचे भान ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.अर्धा तास म्हणता म्हणता कधी तीन तास निघून जातील याचे भान पण उरणार नाही. म्हणून खेळ खेळताना विद्यार्थ्यांच्या खेळाच्या वेळेकडे देखील थोडेसे लक्ष ठेवून जागरूक राहावे,असे मला वाटते.
घरामध्ये पालकांचा आग्रह असतो की विद्यार्थ्याने पहाटे उठून शांत वातावरणात अभ्यास करावा परंतु बरेच मुलं पहाटे उठायला तयार असतीलच असे नाही. काही विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करायला आवडतो, तर काही विद्यार्थ्यांना पहाटे लवकर उठून शांत वातावरणात अभ्यास करायला आवडतो. परंतु हे विद्यार्थ्यांच्या सवयीवर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या सवयी या काही प्रमाणात पहाटे उठणे याला कारणीभूत ठरू शकतात.पालकांनी जर आधीपासूनच विद्यार्थ्याला पहाटेच्या अभ्यासाची सवय लावली तर दहावी किंवा बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना पहाटे उठणे एक कंटाळवाणे वाटता दररोजच्या सवयीचा भाग वाटेल. पहाटे उठूनच चांगल्या प्रकारे अभ्यास होतो हा समज 100% खरा असेलच असे नाही. विद्यार्थी स्वतःच्या शारीरिक क्षमतेबरोबरच जी वेळ अभ्यासासाठी निवडू शकतात,त्यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यास करू द्यावा. पालकांचा अभ्यासाच्या वेळेचा अट्टाहास याठिकाणी आडवा येता कामा नये. नाहीतर मुले उगाचच माझी झोप पूर्ण होत नाही, अशी कारणे देत बसतील.
परीक्षा कालावधीमध्ये येणारे सण-उत्सव हेदेखील विद्यार्थ्यांना मनसोक्तपणे साजरे करू द्यावे. परंतु इथे देखील विद्यार्थ्यांच्या सहभागावर थोडेसे लक्ष असू द्यावे. विद्यार्थी सण उत्सव मध्ये गुंतून अभ्यासाचे भान राहणार नाही,असे होऊ न देता काही कालावधीनंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अभ्यासाबद्दल कल्पना देणे गरजेचे ठरेल. सोबतच क्रिकेटचे टी-ट्वेंटी मालिकेचे सामने याच कालावधीमध्ये दूरदर्शनवर किंवा टेलिव्हिजन वर दाखवले जातात. विद्यार्थी कितीही नाही म्हटलं तरी हे क्रिकेटचे सामने पाहण्यामध्ये गुंतून जातो.अशा वेळी विद्यार्थ्यांची जबाबदारी बनते की,आपण क्रिकेटचे सामने कितीवेळ पहावे व कशाप्रकारे पहावे. आपण जर क्रिकेटच्या सामन्यांमध्ये गुंतून गेलो तर संध्याकाळी सात ते रात्री अकरा- बारा वाजेपर्यंत हा क्रिकेटचा चाललेला सामना आपल्या अभ्यासाचा महत्त्वाचा वेळ तर घेऊन जाणार नाही, याकडे देखील विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. पालकांनी क्रिकेटच्या सामन्यात त्यावेळी शक्य होईल तेवढे स्वतः नियंत्रण ठेवावे व त्यानंतरच विद्यार्थ्याला देखील हे सामने कमीत कमी पाहण्यास परावृत्त करावे.
बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांमधील अंतःप्रेरणा फार महत्त्वाची ठरते.पालक फक्त विद्यार्थ्याला स्वयंअध्ययन करण्यास प्रेरित करू शकतात.विद्यार्थी स्वतः निर्णय घेऊ शकतो, विद्यार्थी आव्हानांना सामोरे जाऊ शकतो व त्यामध्ये तशी क्षमता आहे, असा सकारात्मक भाव निर्माण करू शकतात. परंतु हे करत असताना विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये असणारे दोष हे कदापि विद्यार्थ्यांना जाणवणार नाही, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. तू अभ्यास करत नाही,तुझ्या लक्षातच राहत नाही,तुझे अक्षर सुंदर नाही, तू आळशी होत चालला आहे,यासारख्या नकारात्मक बाबी वारंवार विद्यार्थ्यांच्या समोर बोलल्यास विद्यार्थी मानसिक दृष्ट्या खचून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी विद्यार्थ्यांना होता होईल तेवढे सकारात्मक बाजूने प्रेरित करावे. हळूहळू तुझ्यामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा होईल, तू परीक्षेला नक्कीच चांगल्या प्रकारे सामोरे जाशील, परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पूर्ण क्षमतेने चांगल्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न कर, या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करू शकतो. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना जर मानसिक ताण तणावाला सामोरे जावे लागले, तर येणाऱ्या भविष्यात विद्यार्थ्याची व्यवसायिक शिक्षणाची वाटचाल देखील अडथळ्याची ठरू शकते.म्हणूनच आपण दहावी किंवा बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना समजून घेत असताना सर्व बाजूंनी विद्यार्थ्याला आधाराचा, विश्वासाचा हात मिळेल अशा पद्धतीने आपले वागणे असले पाहिजे. पाल्यासोबतच्या संवादातून विद्यार्थ्यांचे प्रश्न पालकांना समजणार आहे विद्यार्थ्याला छोट्या वाटणाऱ्या अडचणी देखील भविष्यकाळात विद्यार्थी पहिल्यांदा पालकांशी शेअर करेल,म्हणजेच काय तर ज्या बाबी पालक म्हणून आपल्याला माहित असणे गरजेचे आहे,त्या सर्व बाबी पालकांना प्रत्यक्ष आपल्या पाल्याकडूननच माहिती होण्यास मदत होणार आहे. काही वेळा पाल्याची समस्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून पालकांपर्यंत येते आणि त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. .म्हणजे त्या समस्येवर उपाय योजना करणे हे फारच बिकट होऊन जाते. तेव्हा आपला वेळ व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला असतो परंतु हा सुसंवाद जर पूर्वीपासूनच पाल्य व पालक यांच्यामध्ये होत राहिला तर समस्या या व्यापक स्वरूप घेण्याच्या आतच सोडवल्या जातील व आपण प्रसारमाध्यमांवर ऐकतो आहोत,पाहतो आहोत या समस्या आपल्याला आपल्या पाल्याच्या बाबतीत कधीही जाणवणार नाही.
चला तर मग आपल्या पाल्याची बोर्डाची परीक्षा आपण साधी,सोपी व सहज होण्यासाठी पाल्यांना धीर देऊया! पाल्याशी बोलू या, पाल्याचा मित्र होऊ या ! माझ्या सर्व विद्यार्थ्यांना या बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देऊया !

आपला,
श्री.निलेश किसन कासार
प्राथमिक शिक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here