उन्हाळी सुट्टीतही शाळा राहणार सुरू? गुणवत्तावाढीसाठी होणार प्रयत्न

257

वार्ताहर – कोरोनामुळे राज्यातील बहुतांश मुलांना ऍन्ड्राइड मोबाइल नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता घटली असून शिक्षणाची गोडीही कमी झाली आहे. आता शाळा सुरू होऊनही बहुतेक विद्यार्थी शाळेला येत नसल्याची स्थिती आहे. ही स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उन्हाळी सुट्टीतही शाळा सुरू ठेवण्यासंबंधीचा निर्णय शालेय शिक्षण विभाग घेऊ शकतो, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

मार्च 2020 मध्ये राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही दिवसांसाठी सातवीपासूनचे वर्ग ऑफलाइन सुरू झाले. काही दिवसांत दुसरी लाट सुरू झाली आणि पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या. दुसरी लाट ओसरल्यानंतर आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले, मात्र पहिली ते सातवीचे वर्ग उघडलेच नाहीत. तिसरी लाट सौम्य असल्याने 1 फेब्रुवारीपासून राज्यातील पहिलीपासूनच्या सर्वच शाळा उघडल्या. तरीही, शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती फारच कमी आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता पूर्वपदावर आणून त्यांच्यात पुन्हा शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी उपचारात्मक अध्यापनावर विशेष भर दिला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्याचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. मे- ते जून चा पहिला पंधरवडा या काळात शाळांना उन्हाळी सुट्टी असते. त्या सुट्ट्यांमध्येही काही तासांसाठी शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. त्यादृष्टीने अंमलबजावणी केली जाणार आहे. निर्णयाआधी शिक्षक संघटना, शिक्षक आमदारांशी चर्चा केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here