चला संवर्धन करूया वसुंधरेचे..

279

    २२ एप्रिल ‘जागतिक वसुंधरा दिन’

प्रत्येक वर्षी आजच्या दिवशी २२ एप्रिलला आपण ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा करतो. या अनुषंगाने आपण सर्व मिळून पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे सौंदर्य जपण्याचा संकल्प करतो. परंतु काही काळाने याचे विस्मरण होऊन पुन्हा पर्यावरणाच्या निसर्गचक्रात अवास्तव हस्तक्षेप करून पर्यावरणाची हानी करतो. त्यामुळे या धरतीसोबतच मानवी जीवनावरही विपरीत परिणाम होतांना दिसतात. म्हणूनच आज जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पृथ्वीचे संरक्षण व संवर्धन याविषयी विचार करणे गरजेचे आहे.

सौर मंडळांमधील असलेल्या अनेक ग्रहांपैकी केवळ पृथ्वी या एकमेव ग्रहावरच मानवी जीवनास आवश्यक असे वातावरण आहे. त्यामुळे पृथ्वीवरच मनुष्यजीवन आढळते. पृथ्वीला निसर्गतः मिळालेले सौंदर्य, संसाधने अपार आहेत. परंतु जसजसा मानवाचा विकास होत आहे, तसतसा मानव निसर्गाचे शोषण करीत आहे. भौतिक सोयी-सुविधांच्या नावावर अनेक गोष्टी मानवाने या पृथ्वीवर अस्तित्वात आणल्या. परंतु त्या सोयीसुविधांचा उपयोग झाल्यावर त्यातून निर्माण होणारे निरुपयोगी साहित्य, कचरा याची विल्हेवाट लावण्यास मानव असमर्थ झालेला दिसतो. साधे उदाहरण घ्यायचे झाले तर घरातून बाहेर पडणारे सांडपाणी, एखाद्या उद्योगाच्या माध्यमातून बाहेर पडणारे सांडपाणी नदीसारख्या जलस्रोतांमध्ये सोडले जाते. एवढेच नव्हे तर साचलेला कचरा आणि निरुपयोगी हानिकारक कचरा कधी नद्यांच्याकाठी तर कधी रस्त्याच्या कडेला पडलेला दिसतो. त्यामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच आहे. त्यातून निघणारा धूर वातावरणात विषारी वायू पसरवण्याचे कार्य करतो. सोबतच मानवाने केलेल्या वृक्षतोडीमुळे पृथ्वीवरील वाढते तापमान, जमिनीची होणारी धूप, ओला – कोरडा दुष्काळ, ओझोन स्तराचे क्षतिकरण यामुळे पृथ्वीवरील निसर्गाचा समतोल ढासळला आहे. मानवाने स्वतःचा विकास व भौतिक सुविधांच्या हव्यासामुळे पाणी, माती आणि हवेचे सर्वाधिक नुकसान केले आहे. यामुळे पृथ्वीवरील मानवी जीवनाला अनेक आजारांनी ग्रासले आहे. पृथ्वीवरील ऋतूचक्रावरही याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. असेच होत राहिले तर पृथ्वीवर मोठे संकट ओढवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सर्व मानवजातीला वेळीच सावध होऊन वसुंधरेचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. पृथ्वीवरील झाडे, नदी-नाले, पहाड, इत्यादी सर्व निसर्गाचे शिलेदार मानवाचे रक्षण व पालनपोषण करीत आले आहे. त्यामुळे त्यांचे रक्षण करण्यातच समस्त मानवजातीचे कल्याण आहे. म्हणून आपली नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे. पृथ्वीवर वृक्षारोपण करून पृथ्वीला हरीत ठेवणे आणि हवा, जल, वायु प्रदूषणापासून पृथ्वीचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने वाटा उचलला पाहिजे. पृथ्वीला आपण “भूमाता” मानतो. त्यामुळे तिचे पालन, पोषण संवर्धन आईप्रमाणे होणे गरजेचे आहे. पृथ्वीने आई बनून आपल्याला राहायला निवारा, अन्न आणि जगण्यासाठी आवश्यक सर्व नैसर्गिक संसाधने मोफत दिली आहे. त्याचा मोबदला कधीच आपल्याला द्यावा लागत नाही. परंतु त्याचे संवर्धनही आपण करू शकत नाही ही खूप चिंतेची बाब आहे. धरतीमातेने झाडांच्या माध्यमातून अनमोल असा प्राणवायू मोफत दिला आहे. परंतु त्याची आपण कधीच किंमत केली नाही. आज कोरोनाकाळात प्राणवायूसाठी मानवाची होणारी तळमळ पाहून धरतीमातेने आपल्याला दिलेली नैसर्गिक संपत्ती किती अनमोल आहे हे सिद्ध होते. अशा अनेक कितीतरी संकटातून निसर्गाने मानवाला पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण ही काळाची गरज आहे याविषयी संकेत दिले आहे. परंतु मानव त्याकडे कायम दुर्लक्ष करीत आला आहे. म्हणूनच आज प्रत्येक मानवाची जबाबदारी फार मोठी वाढली आहे.

आज जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पुन्हा सर्वांनी पृथ्वीवर असलेल्या सर्व नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करूया, मानवनिर्मित भौतिक सुविधांमुळे निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेऊया, जिथे – जिथे शक्य होईल तिथे – तिथे पर्यावरण वाचवण्यासाठी कार्य करूया आणि सर्वजण या ‘सुजलाम – सुफलाम’ धरतीची भाग्यवान लेकरं बनुया.

निलेशकुमार इंगोले

निलेशकुमार रामभाऊजी इंगोले
मोर्शी, जि. अमरावती
९३७११४५१९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here