जागतिक हवामान दिन दरवर्षी २३ मार्च रोजी साजरा केला जातो. सन १९५० मध्ये आजच्या दिवशी जागतिक हवामान संस्था स्थापन झाली. म्हणून २३ मार्च या दिवसाची जागतिक हवामान दिवस म्हणून निवड करण्यात आली. हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी व हवामानाचे महत्त्व समजावे, तसेच हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी जाणीव-जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने २३ मार्च जागतिक हवामान दिवस म्हणून महत्त्वपूर्ण आहे.
माणसाने विज्ञानाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात प्रगती केली. परंतु हे करीत असतांना निसर्गचक्राच्या गतीला बाधा निर्माण झाली. त्यातूनच पर्यावरणाचा समतोल ढासळत गेला. सुरुवातीला याचे प्रमाण कमी होते, परंतु आता मोठ्या प्रमाणात रासायनिक, आधुनिक अशा अनेक साहित्याच्या वापरामुळे हवामानाच्या हानीचा उच्चांक गाठला गेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील पर्यावरणाच्या चक्राचा समतोल बिघडलेला दिसून येतो.
मानवनिर्मित आधुनिकीकरणामुळे पृथ्वीवर हवामानात मोठ्या प्रमाणात अनपेक्षित बदल घडत आहे. हवामानातील या अनपेक्षित बदलांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे, मानवी साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान तर होतेच शिवाय मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होते. मानवा सोबतच इतर प्राणी, पक्षी यातून सुटू शकत नाही. कारण पृथ्वीवरील सजीवांची जैविक साखळी आहे. ती एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे एका घटकातील बदलाचा परिणाम इतर घटकांवर झालेला दिसून येतो. पृथ्वीवर सजीव सृष्टी व मानवी जीवनासाठी पोषक वातावरण असल्याने पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व टिकून आहे. मानव ज्या ठिकाणी वास्तव्य करतो त्याच्या सभोवतालच्या हवामानाचे नाते त्याच्याशी अतिशय घनिष्ठ असते. त्यामुळेच मानवाच्या अस्तित्वाला अर्थ आहे. म्हणून हवामान हे मानवाच्या जगण्याची आवश्यकता आहे. कारण हवामानाचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. मानवाचे भरण-पोषण करण्यात हवामानाचे नाना आविष्कार महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे हवामानाचे एक प्रकारे आविष्कारच आहेत. पाऊस पडतो आणि धनधान्याची समृद्धी घेऊन येतो. त्याचप्रमाणे मानवाच्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते सणवार एवढेच नव्हे, तर सारी संस्कृतीच आपल्या सभोवतालच्या हवामानावर अवलंबून असते. म्हणूनच हवामान हे आपल्यासाठी जीवनदाता ठरते. पण हे जीवनदायी हवामान कधी कधी संहारकाचेही रूप धारण करते. ज्याप्रकारे ओला – कोरडा दुष्काळ, महापूर, चक्रीवादळे तसेच अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे खूप मोठी जीवित हानी व नुकसान होते. त्यामुळेच मानवाचे आणि हवामानाचे नाते हे संमिश्र आहे. औद्योगिक क्रांती पर्यंतच्या काळात मानवी जीवन व हवामान यांचा समतोल बऱ्याच अंशी सांभाळला गेला. परंतु औद्योगिकक्रांतीने विराट रूप धारण केल्याने मानवी जीवनात झपाट्याने बदल झाले. त्यामुळे या बदलाचे विपरीत परिणाम हवामानावर उमटले. मानवाच्या भौतिक समृद्धीसाठी नैसर्गिक संपत्तीचा झपाट्याने ऱ्हास होत राहीला. अनेकविध कारखान्यातून, हरितगृहांमुळे पृथ्वीभोवतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत गेले. तसेच ओझोनच्या थराचे क्षतीकरण झाले. त्याचप्रमाणे पाण्याचेही प्रदूषण मोठ्या प्रमाणावर घडून आले. निसर्गावर मात करण्याच्या हव्यासापायी मानवाने निसर्गचक्रावर आक्रमण केल्याने माणूस आणि निसर्ग यांच्या नात्यातला तोलच पार विस्कटून गेला. बदललेल्या हवामानाचे जागतिक स्तरावर अनेक विपरीत परिणाम दिसू लागले. पृथ्वीच्या सरासरी तापमानात मोठी वाढ झाली. अनेक प्रकारचे अवर्षण, हिमनग वितळणे, दुष्काळ अशी अनेक संकटे मानवासमोर आज उभी ठाकली आहेत. मानवाचा निसर्गचक्रावर अशाच प्रकारे आघात होत राहिला, तर हवामानातील बदलांच्या परिणामाची व्याप्तीही वाढत जाणार आहे. यापुढील काळामध्ये हवामानातील बदलांचे गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता फार मोठी आहे. नैसर्गिक आपत्तीच्या सर्वात मोठा धोका बदलत्या हवामानामुळे जाणवणार आहे. आता सध्याच्या काळात उन्हाळा चालू असतांना गेल्या चार दिवसांपासून पावसाचे संकट सतत घोंगावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा एक प्रकारे निसर्गाचा असमतोल दिसून येतो. वेळी- अवेळी पाऊस, गारपीट यामुळे होणारे मोठे नुकसान हवामानातील बदलाचेच कारण दिसून येते. एवढेच नव्हे तर मानवाने स्वतःच्या सुविधेसाठी निर्माण केलेल्या संसाधनाच्या वापरानंतर त्यातून निर्माण होणारा कचरा नष्ट न होता त्यातूनही मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत असल्याने ते आरोग्यासाठी घातक ठरते. आपल्याला निसर्गाने दिलेले स्वच्छ हवामान या अनमोल देणगीचा योग्य वापर करून व ते टिकवून त्याविषयी प्रत्येकाने कृतज्ञ असायला हवे. निसर्गात राहून योग्य प्रकारे निसर्गाशी मैत्री व समतोल साधला तर मानवी जीवन सुखद होते. म्हणूनच हवामानातील बदल होण्यामागची कारणे जाणून घेऊन त्यावर आवश्यक उपाय योजना करणे हे सरकारसोबतच प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून यासाठी कार्य करणे काळाची गरज आहे.
आज जागतिक हवामान दिनानिमित्ताने प्रत्येकाने पर्यावरणाला शुद्ध, स्वच्छ ठेवण्याचा निर्धार करुया. या कार्यातूनच पृथ्वीवरील सजीव सृष्टी धोक्याबाहेर ठेवून मानवी जीवन आरोग्यदायी व आनंददायी होईल. माझ्या एकट्याच्या करण्याने किती फायदा होईल? असा विचार न करता या कार्यात प्रत्येकाने आपल्या परीने खारीचा वाटा उचलला तर सर्व मिळून निश्चितच आपण आपल्या पृथ्वीवर स्वच्छ, आरोग्यदायी व आनंदी जीवन जगू शकू.
निलेशकुमार रामभाऊजी इंगोले
सहायक शिक्षक
मोर्शी, जि.अमरावती
९३७११४५१९५