‘हॅम’ च्या तत्वावर आश्रमशाळा व वसतीगृहांची निर्मिती
(तनवीर जहागिरदार)नाशिक – आदिवासी विकास विभागात ‘हॅम’ च्या तत्वावर आश्रमशाळा व वसतीगृहांची निर्मिती करणार आहे. याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आदिवासी विदयार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याकरिता आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळा व वसतीगृह अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 498 शासकिय आश्रमशाळा व 491 वसतीगृहे आहेत. यातील काही वसतीगृहे व आश्रमशाळा या भाडयाच्या इमारतीमध्ये सुरु आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी जागा आदिवासी विकास विभागाला उपलब्ध आहे अशा ठिकाणी आश्रमशाळा व वसतीगृहे उभारण्याकरिता हायब्रीड ॲन्युईटी मॉडेल (हॅम ) या तत्वाचा वापर यापुढे आदिवासी विकास विभाग करणार आहे.
हायब्रीड ॲन्युईटी मॉडेल (हॅम ) हे एक नवीन प्रकारचे सार्वजनिक भागिदारी पध्दती आहे. ज्यामध्ये बांधकाम क्षेत्र प्रामुख्याने येते. यात शासनाच्या उपलब्ध जमीनीवर जर एखादी शासकिय इमारत उभी करायची असेल आणि शासनाकडे पुरेसा निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर शासन भागिदारी पध्दतीने खाजगी विकासकाकडुन किंवा उद्योजकांकडून ते काम करुन घेईल. परंतु यामध्ये शासन खर्चाच्या 40 टक्के रक्कम गुंतवेल आणि खाजगी विकासकाला 60 टक्के रक्कम गुंतवुन सदरचे काम पुर्ण करावे लागेल. उदयोजकाने गुंतवलेली 60 टक्के खाजगी गुंतवणुक प्रकल्पाच्या बांधकामानंतर शासन दर सहा महिन्यांने ठराविक रक्कम बँक व्याजदर अधिक 3 टक्के व्याजाने विकासकाला परत करेल. याचा कालावधी किमान 15 वर्ष असेल. 15 वर्षांनतर इमारतीची मालकी संपूर्णतः शासनाची होईल. हायब्रीड ॲन्युईटी मॉडेल हे भारतात व महाराष्ट्रात रस्ते वाहतुकीत प्रामुख्याने वापरले जात आहे. आता मात्र शासनाकडे जागा आहे, परंतु बांधकामासाठी पुरेसानिधी नसल्याने शासकिय विभागही हि पध्दती अवलंबनार आहे. यामुळे आता विभागाला हक्काच्या इमारती उपलब्ध होतील.
नवनवीन शैक्षणिक आपडेट्स साठी आमच्या fb पेज ला लाईक करा- https://www.facebook.com/DnyanSanvad-105728171462266/