राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या बाल सर्जकांचा सन्मान सोहळा

205

सोलापूर – राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इग्नायटेड माईंड अवॉर्ड च्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील बाल सर्जकांचा सन्मान सोहळा दिनांक 29 जून रोजी सायंकाळी पाच वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अशी माहिती सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, व श्रीमती हेमा शिंदे यांनी दिली. हा सन्मान सोहळा जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी व प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर डायट चे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, डायट चे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. इरफान इनामदार व सृष्टी हनी बी नेटवर्क चे राष्ट्रीय समन्वयक चेतन पटेल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती की, प्रिसिजन कंपनीच्या सीएसआर निधीतून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर जि. सोलापूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर, प्रिसिजन फौंडेशन सोलापुर व स्टेट इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशन ( सर फाउंडेशन) सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “आविष्कार… शोध नवकल्पना असणाऱ्या बाल सर्जकांचा ” हा प्रकल्प राबविण्यात आला होता. शालेय विद्यार्थ्यांमधील नावीन्यतेला प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती वाढीस लावणे यासाठी अविष्कार प्रकल्प राबवण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेशन लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विविध तालुकास्तरावर या कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. या कार्यशाळेमध्ये सहभागी शिक्षक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करून त्यांच्यातील नवकल्पनेला चालना देण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी सुमारे एक हजार पेक्षा जास्त आपल्या नवकल्पना सर फाउंडेशन कडे सादर केलेले होते. या नवकल्पनांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती. अहमदाबाद येथील सृष्टी, हनी बी नेटवर्क व ग्यान, सी एस आय आर या संस्थेच्या संयुक्तपणे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इग्नायटेड माईंड अवॉर्ड च्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील 15 शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर निवड होऊन त्यांना इनोवेशन प्रोत्साहन प्रमाणपत्र मिळाले आहे. या स्पर्धेत देशभरातून सुमारे नऊ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील एक हजार विद्यार्थी इनोव्हेशन फक्त सोलापूर जिल्ह्यातील होते. या स्पर्धेत एवढ्या मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन सादर करणारा सोलापूर हा एकमेव जिल्हा आहे.

या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रमाणपत्र मिळालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे– आकाश मधुकर फडतरे, पृथ्वीराज लाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेजबाभुळगाव तालुका मोहोळ (बोकड गाडी व ऊर्जेचा उपयोग) सुनील समाधान शिंदे, हर्षवर्धन विनायक इंगळे, इनोव्हेटिव्ह स्कूल अंकोली (खताच्या खड्ड्यातून गरम पाणी) वेदांतराज चंद्रकांत नवले, सम्राट अशोक रणदिवे, गणेश दादा भोई, जिल्हा परिषद शाळा शेजबाभुळगाव तालुका मोहोळ ( प्रोटॉटोन बगीच्या), अक्षय मोहन मसुगडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारुंडे तालुका माळशिरस, ( शेळ्यामेंढ्या चारण्यासाठी यंत्र), श्रीकांत राजाभाऊ अवताडे, यशवंतराव चव्हाण विद्यालय फळवणी तालुका माळशिरस, (साप व विंचू पासून संरक्षण करणारा बूट) सुशांत नितीन शिंदे, जिल्हा परिषद शाळा पिलीव तालुका माळशिरस, ( वृक्ष शिष्यवृत्ती) आतिफ परवेज शेख, केंद्रीय विद्यालय सोलापूर, (एलपीजी सिलेंडर इंडिकेटर) प्रसाद विकास काटकर उमाबाई श्राविका विद्यालय सोलापूर, (हात धुणारे मशीन) प्रतिक नवनाथ शिंदे, जिल्हा परिषद शाळा अरण तालुका माढा, (उंच झाडांची फांदी कापणारे मशीन) ओंकार अशोक गडदे, विलासराव देशमुख विद्यालय दामाजी कारखाना मंगळवेढा,(हेल्प मेसेज डिवाइस)कु. प्रणाली सुकुमार थोरात, जिल्हा परिषद शाळा शिरवळ तालुका अक्कलकोट, (रोड क्रॉसिंग रिबीन)
हा कार्यक्रम सत्कारमूर्ती साठी झूमवर व प्रेक्षकांना ऑनलाईन sirfoundation MH या फेसबुक पेज वर या कार्यक्रम मध्ये सहभागी होता येईल.
यावेळी जिल्हा समन्वयक, राजकिरण चव्हाण, अनघा जहागीरदार, नवनाथ शिंदे विजयकुमार वसंतपुरे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here