दुष्ट कोरोना
अजूनही झालं नाही का तुझं समाधान ? अरे राक्षसा गेल्यावर्षीच्या मार्चपासून तु सगळ्या मानवजातीला वेठीस धरलं आहे.तुझ्यामुळे आम्हाला शाळेत जाता आले नाही. वर्गात शिकायचा आनंद तर सोड पण मित्रांबरोबर शाळेच्या मैदानावरही खेळता आले नाही.तुझ्या भीतीने आईबाबा घराच्या बाहेर जाऊ देत नाहीत. आमचं सगळं जीवनच बंदिस्त करुन टाकलस रे तु… सांग ना..काय मिळविलेस तू…यातून ?
अरे किती छळशील रे आम्हाला… नोकरी गेल्याने बाबा चिंतेत आहेत .आमचं कसं होईल या विचाराने आई हुंदके देऊन रडतेय .. ..पाहवत नाही रे तिचा चेहरा .मग मलाही रडू येते रे…मग बाबाच आम्हाला समजवतात..होईल सगळं ठीक म्हणून ….
तु किती क्रूर आणि कठोर आहेस रे…लहान मुलांच्या आईबाबांना घेऊन जाताना …थोडाही विचार केला नाहीस .,,किती यातना होतील त्यांना अनाथ आणि पोरकं करताना… काहीच कसं वाटलं नाही तुला….तुझं काळीज दगडाचं आहे. त्यामुळं तुला दुःख काय असतं ? हे तुला कसं कळणार…
तुझ्या भीतीने माणसं जीव मुठीत धरुन जगत्यात.तु जा…इथून लवकर निघून जा….घेऊ दे आम्हाला मोकळा श्वास…
तु अनेक हसती खेळती कुटुंबे उध्वस्त केलीस .जीवाभावाची माणसं हिरावून नेलीस….कुणाची आई..कुणाचा बाप ..कुणाचा भाऊ…कुणाची बहिण …तरीही अजून तुझं मन भरीत नाही …
तु आमचा शत्रू आहेस.तु दिसत जरी नसलास तरी आम्ही तुला गाडल्याशिवाय राहणार नाही.हे तु लक्षात ठेव.. आम्हाला तु कमजोर समजू नकोस…
एक दिवस आम्ही नक्कीच तुला हरवू…तो दिवस जवळ आलाय…तुझ्या विनाशाचा आणि आमच्या विजयाचा…
©️
लक्ष्मण जगताप
बारामती