‘बालभारतीचा’ ज्ञानपंढरीचा ठेवा माहितीपटाव्दारे झाला खुला…!
आपल्या बालजीवनातील अंतर्मनाच्या कप्प्यातील जीवन शिक्षणाच्या समृद्ध जीवनाची अनुभूती देणाऱ्या अस्सल मराठी मातीतून अवतीर्ण झालेल्या व कधी काळी मनाला भावलेल्या आपल्या बालविश्वातील जीवनावर गारुड निर्माण करणाऱ्या विविध कथा कविता व चित्रे तसेच, महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाची ओळख करून देणारा विस्मृतीत गेलेल्या इतिहासाची पुन्हा नव्याने तरलता अनुभवण्यासाठी बालभारतीने स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच्या क्रमिक पुस्तकांचा माहितीपट तयार केला असून या माहितीपटाद्वारे आता महाराष्ट्रातील प्रत्येकाला आपल्या बाल शिक्षणातील जगण्याचा आस्वाद घेता येणार आहे.
बालभारतीने वैभवशाली ज्ञानाचा वारसा जपला असून, समाज परिवर्तनाचे महत्वाचे साधन बालभारतीने आपल्या हाती दिले आहे. पाठ्यपुस्तके ज्ञानप्राप्ती व शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रमुख साधन असून आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो म्हणूनच लहानपणीचा एक कप्पा बालशिक्षणाचा संस्कार करणाऱ्या या पाठ्यपुस्तकांचा असतो.
भाषेचे, साहित्याचे व वाचनाचे संस्कार क्रमिक पुस्तकांद्वारे नकळत आपल्यावर होत असतात, आयुष्याला साथ- सांगत करणार्या चांगल्या संस्काराचा ठेवा बालभारतीने माहितीपटाद्वारे आपल्या हाती दिलेल्या आहे. लाखो करोडो पुस्तकांची छपाई व मोफत वितरण करण्याची परंपरा बालभारातीद्वारे अत्यंत खडतर असा पाठ्य पुस्तक निर्मितीचा वसा वर्षानुवर्ष जपला असून दरवर्षी शैक्षणिक सत्राच्या आरंभी पुस्तक वितरणाचे शिवधनुष्य लिलया पेलून लाखो शाळांमध्ये शिक्षक व कोट्यावधी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत ही पुस्तके शाळांमार्फत वितरीत केले जातात. हा आपुलकीचा धागा मुलं व पालकांशी जोडला गेला असून विस्मृतीत जाणारे क्षण व आपला वैभवशाली इतिहास आता बालभारतीने माहितीपटाच्या आधारे जपला असून हा माहितीपट कोरोना विषाणूच्या काळात मुलं व पालकांसाठी खुला केला आहे, हा ठेवा आपल्या बालजीवनांतील तरल आठवणीना निश्चित उजाळा देईल म्हणून तो ठेवा प्रत्येकाने पाहिला पाहिजे.असे आवहान बालभारतीने केले आहे.
शब्दांकन:- श्री.आदिनाथ सुतार
खालील महितीपटाद्वारे जाणून घ्या ‘बालभारतीचा’ रंजक इतिहास