देवचंद महाले,हरसूल नाशिक:-
योजना:-
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेच्या संपूर्ण तयारीकरिता ( पूर्व व मुख्य परीक्षा, मुलाखत ) नामवंत खाजगी व्यावसायिक संस्थेमार्फत प्रशिक्षण देणे.
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे संघ लोकसेवा आयोग (यु.पी.एस.सी.) पुरुस्कृत परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण इतर समाज घटकांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. आदिवासी विद्यार्थी हे अति दुर्गम भागात राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते. तशाही परिस्थितीत ते शिक्षण घेऊन शिक्षित होतात. परंतु योग्य प्रशिक्षणाअभावी भारतीय प्रशासकीय सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये ते पात्र ठरू शकत नाहीत. तसेच, संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याकरिता प्रशिक्षणाची व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी राज्यातील विविध आदिवासी लोकप्रतिनिधी / संघटना कडून करण्यात येत आहे. या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या गुणवत्ताधारक उमेदवारांना बार्टी, पुणे या संस्थेच्या धर्तीवर दिल्ली वा महाराष्ट्रातील नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेत संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षांसाठी परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
सविस्तर माहितीसाठी शासन निर्णय अवलोकन करावे:-