स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

391

स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर विचारवंत, क्रियाशील राजकारणी, मसुदा समितीचे अध्यक्ष, थोर शिक्षणतज्ञ, ज्ञानोपासक, दलित उद्धारक, एक महत्तम अभ्यासक अशा अनेक भूमिकेतून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व जगाला परिचित आहेत. तसेच स्त्रियांच्या आयुष्यात तेजाचे पर्व निर्माण करणारे, स्त्रियांच्या आयुष्यातला अज्ञानाचा व असमानतेचा अंधकार संपवून समानतेच्या वाटेवर आयुष्य नव्याने जगण्याची संधी देणारे, स्त्रियांचे कैवारी म्हणूनही त्यांचे कार्य अतुलनीय आहे. स्त्री-पुरुष समता प्रस्थापित करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे.
भारतीय स्त्रीचे आयुष्य दास्यत्व, गुलामगिरी, पडदा पद्धती, पितृसत्ताक कुटुंबपद्धती, केशवपन, सतीची चाल, संतती जननाचा भार, बहुपत्नीत्व अशा अनेक प्रथांमध्ये बंदिस्त झाले होते. कठोर धार्मिक प्रथा आणि त्यातील अनिष्ट रूढी परंपरांनी स्त्रियांचे जीवन दुःखाचे आणि हलाखीचे करून टाकले होते. समाजात त्यांचे व्यक्ती म्हणून अस्तित्वच नाकारले गेले होते. तेव्हा उदय झाला तो एका तेज पर्वाचा, ज्यांनी घटनेच्या माध्यमातून स्त्रियांचा एक व्यक्ती म्हणून सन्मान केला. समानतेच्या तत्त्वावर आधारलेली हीच राज्यघटना स्त्रियांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण करणारी ठरली. आज समाजात स्त्री आपल्याला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करतांना दिसते. त्याचे सर्व श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. महात्मा फुले यांनी स्त्री जीवनात शैक्षणिक क्रांतीचा पाया घातला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या जीवनात सामाजिक क्रांतीचा आलेख उंचावला. स्त्री-पुरुष समानता आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फार जवळचा संबंध आहे. विषमतेच्या दलदलित अडकलेले स्त्रियांचे जीवन मुक्त व्हावे म्हणून त्यांनी स्त्री उद्धारक चळवळीला लोकशाहीचा भक्कम पाठिंबा दिला. या महामानवाने त्यांच्या विचारातून, लेखनातून, भाषणातून प्रत्येक वेळी स्त्री-पुरुष समानतेचा उद्घोष केला. “न स्त्री-स्वातंत्र्य महर्ती” म्हणून संस्कृतीने नाकारलेल्या स्त्री जीवनाला नवा आयाम दिला. एक नागरिक म्हणून स्त्रियांना सर्व अधिकार मिळावे, स्त्री सक्षम व्हावी, निर्भय व्हावी, व्यक्तिस्वातंत्र्याचा स्त्री म्हणून पुरस्कार व्हावा म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा मांडला. हिंदू कोड बिल स्त्रियांचे आयुष्य बदलून टाकणारे भारतीय समाजातील क्रांतिकारी पाऊल होते. स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल करणारे, कायद्याच्या चौकटीत समानता व सामाजिक न्याय प्रस्थापित करणारे हिंदू कोड बिल त्यांनी संसदेसमोर मांडले. स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी घटस्फोटाचा अधिकार, पोटगीचा अधिकार, वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार, पुनर्विवाह, इत्यादी स्त्रियांच्या हक्कांसाठी त्यांनी हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना अधिकार प्राप्त व्हावे यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भरघोस प्रयत्न केले. हिंदू कोड बिल हे समाजातील स्त्रियांचे स्थान निश्चित करण्यासाठी, स्वातंत्र्याचा – समानतेचा पुरस्कार करणारे महत्वपूर्ण विधेयक होते. परंतु सनातनी समाजाकडून या विधेयकाला कडाडून विरोध झाला. त्यानंतर स्त्रियांच्या बाबतीत जे अनेक कायदे झाले ते याच विधेयकावर आधारलेले होते. म्हणून म्हणावेसे वाटते,
“स्त्री-पुरुष समानतेचे बीज पेरलेत तुम्ही,
लेखणीने तुमच्या विषमता मिटवलीत तुम्ही”
स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होतांना, स्त्रियांची प्रगती होतांना बालविवाह, संतती जननाचा भार, इत्यादी अनेक अडचणी येतात. तेव्हा समाजात पुरुषांनी स्त्रियांशी समानतेचे, मानवतेचे, मैत्रीचे नाते प्रस्थापित केले तरच खरीखुरी समानता प्रस्थापित होऊ शकते हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिला. त्यांचा हा विचार सामाजिक समतेच्या दृष्टीने मार्गदर्शक व समाजाचा आधारस्तंभ ठरतो. आजची स्त्री कायद्याने सक्षम आणि स्वतंत्र झाली असली, तरी समाजात स्त्रीयांना सन्मान मिळण्यासाठी त्यांचे विचार मौलिक देणगी आहे. स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करतांना ते शिक्षणाच्या सार्वत्रीकरणावर भर देतात. पुढच्या पिढ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानता मूल्य रुजवायचे असेल, तर स्त्रियांचे शिक्षण आवश्यक आहे असे ते म्हणतात. नोकरीच्या ठिकाणी तिला स्थैर्य लाभावे, प्रसूती काळात रजा मिळावी, बालकांचे योग्य संगोपन करण्यासाठी, स्वतःचे आरोग्य जोपासण्यासाठी प्रसुतीपूर्व व प्रसूतीनंतर काहीकाळ पगारी रजा मंजूर व्हावी हा अधिनियम डॉ.बाबासाहेब आंबेडकर कायदामंत्री असतांनाच झाला. मातृत्व हे स्त्रीच्या कर्तृत्वाच्या आड येऊ नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला हा कायदा म्हणजे संपूर्ण स्त्री वर्गावर त्यांचे अनंत उपकारच होय. लिंगभेदकेंद्री संस्कृतीवर आघात करून, विषमता नष्ट करून सामाजिक, आर्थिक न्याय मिळवून देणारे तसेच समस्त स्त्रीवर्गाला समानतेच्या उज्ज्वल वाटेकडे नेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते होते. म्हणूनच स्त्री-स्वातंत्र्याचा, समतेचा, त्यांच्या हक्कांचा पाठपुरावा करणारे दीपस्तंभ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. जाती-धर्माच्या चौकटीत, लिंगभेद – वर्णभेदांच्या, अनिष्ट रूढी परंपरांनी बंदिस्त असलेले स्त्रीचे आयुष्य मुक्त करण्यात, त्यांना जगण्याची प्रतिष्ठा मिळवून देण्यात फार मोठा वाटा या महामानवाचा आहे. म्हणून म्हणावेसे वाटते,
“तुम्ही दिले आम्हा जगण्यास मुक्त आकाश,
आयुष्यात पेरलात नाविण्याचा प्रकाश”
प्रत्येक स्त्रीला समानतेने जगण्याचा, मतदानाचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा, न्यायाचा अधिकार देणाऱ्या या महामानवास कोटी कोटी नमन.

लेखक- राजश्री शेषरावजी खाजोने
चांदूरबाजार, जि.अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here