मार्च २०२० पासून कोविड १९ या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये झालेला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च २०२० पासून राज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली आहेत. दरवर्षी साधारणतः जूनमध्ये सर्व राज्यांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होत असते. परंतु कोविड १९ या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सद्य परिस्थितीतही कमी झालेला दिसून येत नाही. त्यामुळे सन २०२१ २२ मध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरू करता आलेल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरू करता न आल्यामुळे विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करण्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात.
या अनुषंगाने सन २०२१ २२ या शैक्षणिक वर्षाकरीता सुद्धा सन २०२०-२१ प्रमाणे इयत्ता १ ली ते १२ वी चा २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे.
तरी इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विषयांच्या कमी केलेल्या २५ टक्के पाठ्यक्रमाची इयत्ता निहाय व विषय निहाय यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या www.maa.in या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
सदर यादी आपल्या अखत्यारीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमुख, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या निदर्शनास आणून द्यावी.