शशिकांत इंगळे,
स्थानिक गोंडी-माडिया भाषा शिक्षणाचे माध्यम
वार्ताहर: आदिवासी वर्ग हा शिक्षणापासून वंचित असलेला वर्ग आहे. ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत गोडी निर्माण व्हावी आणि इंग्रजी व मराठी भाषा सोपी करून शिकता यावी. या करीता गडचिरोलीतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने नवीन उपक्रमाला सुरुवात केली आहे. ‘मावा साळा,मावा शिक्षण’ म्हणजे ‘माझी शाळा, माझे शिक्षण. या नावाने उपक्रम पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत गोडी निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. आदिवासी मुलांसाठी हा प्रथम शैक्षणिक उपक्रम आहे. गडचिरोली भागात ग्रामीण भागातील आदिवासी घरांमध्ये गोंडी-माडिया भाषेचा वापर केला जातो. त्यामुळे मुलांना मराठी भाषा व्यवस्थित समजत नाही. ही अडचण लक्षात घेऊन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाअधिकारी मा. आशिष येरेकर (आय.ए.एस.) यांनी पाच ते सहा शिक्षकांचा एक समूह असे चार समूह तयार केले, यामध्ये पहिली ते तिसरी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व मराठी भाषेच्या पुस्तकातील शब्दांना पर्यायी ठरवणारे गोंडी-माडिया या भाषेचा शब्दसंग्रह तयार केला आहे. या शिक्षकांनी खूप मेहनतीने असा हा शब्दसंग्रह तयार केला आहे. देवनागरी लिपीत पण गोंडी-माडिया भाषेत वापरला जाणारा शब्द त्यात नमूद असल्यामुळे विद्यार्थ्यांना चटकन समजतो आणि लक्षातही राहतो. या शब्दकोशामध्ये शिक्षकांनी विशेष म्हणजे योग्य ठिकाणी चित्राचा वापर केल्याने पुस्तक हाताळतांना मुलांना शब्दकोशा बद्दल आवड निर्माण होईल. नवीन शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावी त्यासाठी १ हजार पुस्तिका तयार करून लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रकल्प अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
छान उपक्रम आहे.
मुलांना आपल्या भाषेत शिक्षण मिळायलाच हवं.