किनवट आश्रमशाळेची झाली कनिष्ठ महाविद्यालयात श्रेणीवाढ
शशिकांत इंगळे,
वार्ताहर: किनवट तालुका तेलंगणा राज्याच्या काठावर असून येथील डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी युवकांसाठी आता महाराष्ट्र शासनाने पुढील शिक्षणाची दिशा उपलब्ध करून दिली आहे. किनवट येथे असलेले शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ही आदिवासी विकास विभागांतर्गत चालवली जाते या आश्रमशाळेची निवड करून त्यास सलग्न कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा या आश्रमशाळेला प्राप्त करून दिला आहे. दुर्गम भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस शासनाच्या विचाराधीन होता.
जिल्हा आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार, जिल्हाधिकारी डॉ. विपिन झटनकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाचा पाठपुरावा करून किनवट येथील आश्रमशाळेला अकरावी व बारावीची मान्यता मिळवून घेतली.
किनवट येथील आश्रम शाळेला कला व विज्ञान या दोन्ही शाखांना अटीनुसार मान्यता दिली. तसा शासन निर्णय आदिवासी विभागाने काढला आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून इयत्ता अकरावीचे कला व विज्ञान शाखेचे वर्ग आश्रमशाळेमध्ये सुरू करण्यात यावेत आणि शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता बारावीचे कला व विज्ञान शाखेचे वर्ग सुरू करण्यात यावे असे शासन निर्णयात निर्देशित केले गेले आहे.
वित्त विभागाच्या शासन निर्णयात शिथीलता आल्यास आकृतीबंधा नुसार नवीन पद मान्यतेचा प्रस्ताव हा आदिवासी विकास विभागामार्फत शासनास सादर केला जाईल. सदरील श्रेणीवाढ मान्यता देताना आश्रम शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाला हा किमान ८० टक्के असावा. तसेच किमान ६० टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळवणे आवश्यक आहे. सोबतच बालकाचा सक्तीचा व शिक्षणाचा मोफत अधिकार अधिनियम ३००९ अंतर्गत करण्यात आलेल्या सोयी व सुविधा विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध करणे व शिक्षणाचा स्तर उत्कृष्ट ठेवणे बंधनकारक राहील. असेही या श्रेणीवाढ मान्यता देताना स्पष्ट केले आहे.
आनंद पुढील शिक्षणाच्या नव्या संधीचा
नांदेड जिल्हा आकारमानाने इतर जिल्ह्याच्या तुलनेत मोठा आहे. त्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. किनवट तालुक्यातील युवकांना विकासाच्या संधी मिळण्यासाठी चांगली शिक्षण उपलब्ध करून देणे खूप गरजेचे होते. त्या दृष्टीने किनवट येथील आश्रम शाळेच्या श्रेणी वाढीचा प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून विचाराधीन होता. आदिवासी विभागासोबत पाठपुरावा करून आता आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना कला व विज्ञान या दोन्ही शाखेतील बारावी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध झाले. याचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.