शशिकांत इंगळे,अकोला
टीईटी परीक्षेत पात्र असून सुद्धा आतापर्यंत पदभरती बंद असल्यामुळे शिक्षकांवर संकटांंचे डोंगर कोसळला आहे. यासाठी टीईटी प्रमाणपत्राची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
एनसीईआरटी ने शिक्षक पद नियुक्तीसाठी उत्तीर्ण होण्याची अट घातली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यात 15 डिसेंबर 2013 रोजी पहिली टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये पहिल्या पेपरसाठी ३ लाख ८३ हजार ६३० परीक्षार्थी तर दुसऱ्या पेपरसाठी २ लाख ३५ हजार ७६९ परीक्षार्थी बसले होते.
यातून ३१ हजार ७२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण परीक्षार्थींना मे 2014 मध्ये टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र देण्यात आले होते. प्रमाणपत्राची मुदत सात वर्षे देण्यात आली होती. ती मुदत मे 2021 मध्ये संपणार आहे.
परंतु याच कालावधीमध्ये शिक्षण विभागाने 2013 वर्षापासून शिक्षक भरती बंद केली होती. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण होऊ सुद्धा शिक्षक पदासाठी नेमणुका झाल्या नाहीत आणि सोबतच याच वर्षी प्रमाणपत्राची वैधता ही संपणार आहे. अशा परिस्थितीत टीईटी उत्तीर्ण उमेदवारांवर अन्याय होणार असल्याने सदरील प्रमाणपत्राची मुदत वाढविण्याबाबत शिक्षक आमदार नागो गाणार तसेच शिक्षण परिषदेच्या वतीने कार्यवाहक शिवनाथ दराडे यांनी शालेय मंत्री वर्षाताई गायकवाड तसेच परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे मागणी केली.