मागील महिन्यात दिनांक १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा, आंध्रप्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथून चांद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाले. दिनांक २३ ऑगस्ट, २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान ३ सॉफ्ट लॅन्डिंग चंद्राच्या ( अवतरण) दक्षिण ध्रुवावर होणार आहे. ह्याचे थेट प्रक्षेपण इस्रोची वेबसाईट isro.gov.in तसेच यु ट्यूब चॅनेलफेसबुक पेज येथून होणार आहे.
चांद्रयान ३ बाबत माहिती
ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. यात चांद्रयान २ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर आहे. परंतु ऑर्बिटर नाही.
२२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान- २ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशत: अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर इस्रो नियोजित चंद्रयान- ३ मोहीम हाती घेतली होती चांद्रयान- ३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी २: ३५ वाजत श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. उड्डाणावेळी त्याचे वजन ३९०० किलो होते. जुलै महिन्यात चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी असते या कारणाने उड्डाणासाठी ही तारीख निवडण्यात आली. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर अंदाजे ३.८४.४०० किलोमीटर आहे.
उड्डाणानंतर पुढील २२ दिवसात अर्थात ५ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. लूनर ऑर्बिट इंजेक्शनच्या माध्यमातून चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. बंगळुरु येथून इस्रोने दिलेल्या सुचनेप्रमाणे चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. आणि चंद्राचे फोटो घेतले आहेत, जे टूविटर पेजवरून प्रसारित करण्यात आले आहेत.
इस्रोने चंद्रयान- ३ मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टे निश्चित केली आहेत, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:
● चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर सुरक्षितपणे उतरवणे.
● चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक,
● चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादीवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साईट वैज्ञानिक निरीक्षण, इंटरप्लॅनेटरी म्हणजे दोन ग्रहांमधील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास
LIVE प्रेक्षपण लिंक- https://www.youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss