Site icon ज्ञानसंवाद

सामाजिक सार्वभौमत्वासाठी डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची गरज…! कुलप्रमुख – श्री. भाऊसाहेब खरसे

आदिनाथ सुतार;राजूर

सध्या देशात सांस्कृतिक राष्ट्रवाद फोफावत असताना वेगवेगळ्या समूहात माणूस विभागला जात आहे अशा वेळी देशाच्या सार्वभौमत्वासाठी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कुलप्रमुख श्री. भाऊसाहेब खरसेे यांनी केले.
शैक्षणिक संकुल मवेशी ता.अकोले जि. नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या सहासष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्राचार्य डॉ. देवीदास राजगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात श्री.खरसे बोलत होते. श्री.खरसे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की बाबासाहेबांमुळे स्वातंत्र्यानंतर आरक्षणाचा लाभ मिळुन अनेक गोरगरिबांच्या मुलांच्या पिढ्या शिक्षणाच्या मार्गाने स्वतःच्या पायावर उभा राहून सामाजिक योगदान देत असून आपल्या समाजाच्या जागृतीसाठी वाहून घेत असल्याने त्यांना आत्मभान आले आहे. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. देविदास राजगिरे आपल्या प्रमुख भाषणात म्हणाले की स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी शोषणात्मक मानसिकतेचे उच्चाटन करण्यासाठी समान दर्जा व प्रतिष्ठा ही मूल्ये असणाऱ्या सामाजिक रचना निर्मितीसाठी योगदान दिल्याने स्वातंत्र्योत्तर समाजात जातीअंताचे परिवर्तन घडले आहे .


कार्यक्रमात श्री. भांबरे म्हणाले की,बाबासाहेबांनी सन्मानाने जगणे शिकविले असून जाती धर्माच्या बेड्या तोडुन मानवतेची पूजा करायला शिकवले आहे.
मनोगत व्यक्त करतांना श्री. मारुती लहामटे सर म्हणाले की,संविधानाने शिक्षणाचा अधिकार मिळाल्यामुळे आदिवासींच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपला सामाजिक विकास साधला असून कोरोनामुळे मध्यंतरी शिक्षण थांबले होते परंतु मुलांनी शिक्षणाचे महत्व ओळखून बाबासाहेबांनी दाखवलेल्या खडतर वाटेवरून माग॔क्रमन करून स्वतः बरोबरच आपल्या समाजाचाही विकासास हातभार लावावा.
काय॔क्रमात श्री. अंकुश चावडे, श्री पवार,जाधव,कातकडे, उदमले, सहाणे यांच्यासह श्रीम.भारती पिंगळे यांनीही उपस्थितांना ऊदबोधित केले.अनेक विद्यार्थी विद्यार्थीनींनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या भाषणातून बाबासाहेबांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री इंगळे सर यांनी तर शेवटी आभार श्री. आदिनाथ सुतार सर यांनी मानले कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता.

Exit mobile version