शशिकांत इंगळे,अकोला
‘सायन्स सिटी’ उभारण्यासाठी राज्य सरकारने केली समिती गठीत.
वार्ताहर: जागतिक दर्जाचे ‘भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी’ (सायन्स सिटी) शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे उभारण्यात येणार आहे त्याकरिता राज्य सरकारने कार्यकारी समिती आणि कार्यबल गट स्थापन केला आहे.
सायन्स सिटी उभारण्यासाठी पुढील पाच वर्षात सर्व प्रकारचे आवश्यक ते धोरणात्मक निर्णय आणि निधी वितरण करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय कार्यकारी समिती मार्फत घेण्यात येणार आहेत. तर सायन्स सिटी उभारणीसाठी तथा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सर्व जबाबदारी कार्यबल गटाची असणार आहे.
2025 पर्यंत राज्यात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने व्यापक धोरण आणि व्हिजन डॉक्युमेंट विकसित केले आहे. त्यानुसार केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड येथे सायन्स सिटी हा प्रकल्प उभारण्यास मंत्रिमंडळाच्या 1 सप्टेंबर 2021 च्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा याकरिता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 7.5 एकर जागा विज्ञान केंद्र उभारणीकरिता दिले आहे. त्यापैकी 1.75 एकर जागेवर महानगरपालिकेचे यापूर्वीच एक विज्ञान केंद्र उभारलेले आहे. उर्वरित 5.75 एकर जागेमध्ये सायन्स सिटी प्रकल्प उभारणीसाठी राखीव आहे. या जागेवर पुढील 5 वर्षात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संमतीने सायन्स सिटी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
सायन्स सिटी प्रकल्प उभारणीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अप्पर सचिव हे कार्यकारी समितीचे अध्यक्ष असतील. नियोजन विभागाचे अपर सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त हे सदस्य म्हणून कार्य पाहतील. तर राज्याचे शिक्षण आयुक्त हे कार्यकारी समिती सदस्य सचिव म्हणून कार्यभार पाहतील.
शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करिता राज्याचे शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट स्थापन करण्यात आला आहे. यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त हे सहअध्यक्ष असतील तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक (मुंबई), पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विज्ञान केंद्राचे संचालक, शिक्षण आयुक्त कार्यालय पीडब्ल्यूसी सल्लागार उपसंचालक (अंदाजपत्रक व नियोजन), हे सदस्य म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
❓ कार्यबल गटाचे कामकाज कसे चालेल.
▫️ सायन्स सिटी उभारण्यासाठी आवश्यक ती अंमलबजावणीचे कार्य करणे.
▫️जागतिक दर्जाची सायन्स सिटी उभारण्यासाठी राज्य सरकारच्या मंजूर निधीशिवाय स्थानिक पातळीवरून निधी उपलब्ध करणे.
▫️औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारी अशा स्त्रोतांद्वारे निधी उपलब्ध करण्याची कार्यवाही करणे.
❗’सायन्स सिटी’चे वैशिष्ट्ये :
▪️ जागतिक दर्जाची ‘सायन्स सिटी’ असेल.
▪️ विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे आणि ती जोपासणे.
▪️ पिंपरी-चिंचवडमधील ५.७५ एकर जागेत साकारणार.
▪️पुढील पाच वर्षात उभारणार.
▪️केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत १९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर.