Site icon ज्ञानसंवाद

सध्या शाळा सुरू करणे योग्य नाही: आरोग्य मंत्री राजेश टोपे


प्रभाकर कोळसे , हिंगणघाट
देशासह राज्यात कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे.शाळांचे शैक्षणिक सत्र प्रारंभ झाले ते ही विद्यार्थी विनाच. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. त्यात आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढलेला दिसत आहे. त्यातच आता कोरोना नियंत्रणात असलेल्या भागात शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागाने सांगितलं होतं. आता त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात शाळा सुरू करणे संदर्भात गंभीर इशारा दिला आहे.
अजूनही लहान मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले नाही. लहान मुलांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे. त्यामुळे सध्या शाळा सुरू करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. १८ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांचे लसीकरण होत असल्यानं महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्यात कोरोनामुक्त झालेल्या विभागातील शाळा पहिल्या टप्यात सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मागील महिनाभरापासून एकही रुग्ण न आढळलेल्या ठिकाणी १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जात आहेत. वर्ग सुरू करण्यापुर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहेत. पण लहान मुलांचं लसीकरण झालं नसल्यानं आता लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो.

Exit mobile version