Site icon ज्ञानसंवाद

एक पाऊल भविष्यवेधी शिक्षणाच्या दिशेने …. (लेख क्रमांक १)


विद्यार्थ्यांना भविष्याचे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक बनविण्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षकांना समर्पित ….

“ गुरूविण न मिळे ज्ञान ,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान .
जीवन भवसागर तरावया,
चला वंदु गुरूराया .”

प्रास्ताविक 
                  एकेकाळी भारत  देशात नचिकेतासारखी मुलं आत्मविद्येसाठी हट्ट धरून बसत होती,भक्त प्रल्हादासारखी मुलं अत्याचाराला न जुमानता स्वत:ला पटलं तेच करत होती,बाळ ध्रुवासारख्या मुलात अढळपद मिळवण्याची हिंमत होती,आरुणीसारखा मुलगा गुरूंच्या शब्दाखातर मुसळधार पावसात रात्रभर शेताचा बांध थोपवून आडवा झाला होता ही मुलं लेचीपेची नव्हती.ती बुद्धिमान होती,कष्टाळू होती,अन्याय सहन न करणारी होती.शिक्षणाने माणसाचं अशाप्रकारे चारित्र्य घडायला हवं;पण आज आपण मुलांना चंगळवादी आणि अकार्यक्षम बनवत आहोत याचे कारण शिक्षण म्हणजे काय हेच आपण विसरलो आहोत. 

शिक्षण म्हणजे..
शिक्षण म्हणजे समजणं,शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणं,शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं,शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं,शिक्षण म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न कळणं,शिक्षण म्हणजे चंगळवादापासून दूर राहणं,शिक्षण म्हणजे स्वावलंबी होणं आणि शिक्षण म्हणजे चांगला माणूस होणं.
शिक्षण नीरस नसावं,त्याचं ओझं वाटू नये,मुलांना आवडावं,भविष्यात उपयोगी पडावं,परीक्षेपुरतं केलं आणि विसरलं असं नसावं.प्रत्येक विषय मुलांच्या जीवनाशी आणि समाजाशी जोडलेला हवा.सगळं शिक्षण प्रत्यक्ष प्रयोगातून झालं की ते दीर्घकाळ स्मरणात राहतं. भूगोल शिकताना मुलं गावातली घरं पाहतील.घरं कशाने बांधलीत? त्यांच्या भिंती बुटक्या का? छपरं उतरती का?जनावरं कुठे बांधतात? माणसं काम कुठे करतात? या बाबींचे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले तर ते आयुष्यभर भूगोल विसरणार नाहीत.गाणी,नृत्य,नाटक यांचा उपयोग करून इंग्रजी शिकवलं तर इंग्रजी विषयाची भीती त्यांच्या मनातून निघून जाईल.किल्ले,राजवाडे आणि प्राचीन वास्तूंना प्रत्यक्ष भेट देऊन इतिहास शिकवला गेला तर विद्यार्थ्यांना हा विषय किचकट वाटणारच नाही.विद्यार्थ्यांना दुकानात,बाजारात प्रत्यक्ष व्यवहार करू दिला तर खरेदी-विक्रीतून ती लवकर शिकतात.त्यांच्या जीवनात गणित अधिक चांगल्या प्रकारे ठसवले जाईल.स्वभावातील संकुचितपणा नष्ट होऊन शिक्षणाने व्यक्तीला समाजात राहायला शिकवले पाहिजे,हे स्पष्ट करताना डॉ.राधाकृष्णन म्हणतात.“ The importnace of education is not only in knowlege and skill but it is to help us to live with other’s” आज माणूस एकमेकांपासून तुटत चालला असताना त्यांचा हा विचार किती प्रेरणादायी वाटतो.
EDUCATION
E – ENERGY
D – DISCIPLINE
U – UNITY
C – CONFIDENCE
A – AIM
T – TALENT
I – INTEREST
O – OPPORTUNITY
N – NATIONALITY

          उत्साह,चैतन्य,स्वयंशिस्त,एकोपा,आत्मविश्वास,ध्येय,विद्वत्ता,आनंद,संधी आणि राष्ट्रीयता यांचा अनोखा संगम म्हणजे खरे शिक्षण होय.शिक्षण केवळ भाकरी कमविण्यापुरते मर्यादीत रहायला नको.

जी शिक्षणप्रणाली केवळ उपजिवीकेचे साधन शिकविते ती कला असते आणि जी शिक्षणप्रणाली जीवनविकासाचे साधन शिकविते ती विद्या असते.”
विद्यार्थ्यांना भविष्याचे सुजाण,सुसंस्कृत,सक्षम,साक्षर आणि सुदृढ नागरीक या भूमिकेत बघायचे असेल तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा अचूक वेध घेऊन त्या दिशेने शिक्षण देणे महत्वाचे ठरेल .
क्रमशः ………

श्री.रामसिंग पी.राजपूत (प्राथ.शिक्षक)
शास.माध्य.आश्रमशाळा,देसगाव
ता.कळवण जि.नाशिक
9404873847

Exit mobile version