शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: ग्रामपंचायत माणगाव यांनी टीव्हीवर शाळा हा अभिनव उपक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमाद्वारे इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग भरवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. परंतु हे वर्ग शाळेत भरणार नसून चक्क विद्यार्थ्यांच्या घरामध्येच भरणार आहेत! याला सर्व गावकऱ्यांनी सहमती सुद्धा दर्शवली आहे. कोरोना महामारी च्या काळात शाळा बंद आहेत. मात्र ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. अशी परिस्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील ओढ कमी होत आहे. भविष्यात याचा विद्यार्थ्याला खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारू शकत नाही. आतापर्यंत महाराष्ट्रातील कोरोना संकट कमी झालेले नाही. आणि नव्याने तिसऱ्या लाटेची चर्चा सुद्धा सुरुवात झालेली दिसत आहे. तज्ञांचे सांगणे आहे कि, तिसरी लाट मुलांसाठी घातक आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत माणगाव (तालुका- हातकणंगले) गावातील केबल नेटवर्कच्या माध्यमातून ०६ जुलै २०२१ वार- मंगळवार पासून ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत इयत्ता १ली ते इयत्ता १० वी पर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ३ कॅमेरे तसेच ३ खोल्यांमध्ये उपलब्ध करून देणार येणार आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार आहे. प्रत्येक तासिका ही किमान ३० मिनिटाची असणार आहे. त्या नुसार विषयांचे वेळापत्रक शिक्षकांनी देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. सदरील वर्ग ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरकारी सुट्ट्या वगळून सुरू राहणार आहेत. माणगाव या गावात १५०० कुटुंबे आहेत त्यापैकी १४५० कुटुंबांच्या घरात टीव्ही आहे. त्यामुळे या गावात हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवला जाईल यात काही शंका नाही. या उपक्रमाचे सर्व पालकांनी स्वागत केले आहे. असे गावचे सरपंच राजू मुकदूम यांनी सांगितले.