सोलापूर ता.३१) जिल्ह्याच्या विशेष करून माळशिरस तालुक्याच्या शिक्षणक्षेत्रात स्वतःच्या कर्तुत्वाची छाप उमटविणारे यशवंतनगर केंद्राचे विद्यमान केंद्रप्रमुख सुधीर गोविंद नाचणे गुरुजी ३५ वर्षे ११ महिने शिक्षणसेवा करून ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी तन-मन-धन अर्पण करून प्राथमिक शिक्षकाच्या चार ‘फॉर्मेट’ मध्ये अर्थात उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख पदावर अष्टपैलूत्व सिद्ध करणारी निर्णायक भूमिका त्यांनी पार पाडली. बीआरसी मधील त्यांची विषय तज्ञाची भूमिकाही उच्च प्राथमिक शिक्षणासाठी मोलाची राहिली आहे.
त्यांनी राबविलेले शैक्षणिक उपक्रम विशेष करून कृतीयुक्त गणित पेटी, बालचित्रवाणी या दूरदर्शन कार्यक्रमातील बहुउद्देशीय शैक्षणिक साहित्य निर्मिती, राज्य पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम निर्मितीतील योगदान, एससीईआरटी मधील गणित विषयातील बहुमूल्य योगदान शाळा स्तरापासून तालुका जिल्हा आणि राज्य स्तरापर्यंत मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरले. राज्यभर चर्चेत असणाऱ्या आणि उपक्रम शील शिक्षकांच्या एका मोठ्या व्यासपीठाचे अर्थात ‘ सर फाऊंडेशनचे’ संस्थापक सदस्य आणि समन्वयक असणारे सुधिर नाचणे गुरुजी यांची भूमिका ‘ सर ‘ च्या वाटचालीत निर्णायक राहिली आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा व राज्य स्तरावर गुणवत्ता यादीत आले आहेत. Covid-19 च्या काळातील ‘शाळा बंद,शिक्षण सुरू’ योजनेअंतर्गत लर्निंग फ्रॉम होम या नव संकल्पनेतील योगदान महत्वपूर्ण राहिलेले आहे.
त्यांना मिळालेले उल्लेखनीय पुरस्कार व कार्य:
जिल्हा आदर्श शिक्षक-२००३, जिल्हास्तरीय गुणवंत विशेष तज्ञ- २००८, जिल्हास्तर आदर्श केंद्रप्रमुख-२०१८, राष्ट्रीय स्तरावरील सर रतन टाटा इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार व फेलोशिप २००५, सर फाउंडेशनचा राष्ट्रीय इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार २०२०, राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार २००६, वसंतदादा काळे प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शैक्षणिक कार्य पुरस्कार २०१५, स्मार्ट पीटी अंतर्गत उत्कृष्ट गणित शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शन राज्यात द्वितीय १९९९, इंग्रजी शैक्षणिक साहित्य निर्मिती पुणे विभागात प्रथम -२०००, कृतीयुक्त गणित पेटी माध्यमातून आयआयएम अहमदाबाद येथे नवोपक्रम सादर, दूरदर्शनच्या बालचित्रवाणी कार्यक्रमात बहुउद्देशीय शैक्षणिक साहित्य निर्मिती सहभाग १९९९, जीवन शिक्षण मासिकात मुलाखत, शिष्यवृत्ती मार्गदर्शनपर लेख.
बदलत्या काळातील शिक्षणाच्या संकल्पना आणि नवीन प्रवाह चाणाक्षपणे आत्मसात करून प्रत्येक आघाडीवर शैक्षणिक नेतृत्व करणारे सुधिर नाचणे गुरुजी हे फक्त विद्यार्थीच नव्हे तर उपक्रमशील शिक्षक घडविण्याची चालती बोलती कार्यशाळाच होती. वयोमानानुसार एक आदर्श शिक्षक, एक सक्षम प्रशासक शासकीय सेवेतून सेवा निवृत्त होत आहेत. शिक्षणाच्या बदलत्या आणि आव्हानात्मक युगात नाचणे गुरुजीं सारख्या कर्तबगार व्यक्तिमत्वांची उणीव शिक्षणक्षेत्राला भासत राहणार हे नक्की. म्हणूनच नाचणे गुरुजीं सारख्या शिक्षण सेवेसाठी जगलेल्या व्यक्तिमत्त्वांनी नोकरीतून सेवामुक्त होताना आपल्या अनमोल मार्गदर्शनातून शिक्षणाची सेवा सुरूच ठेवण्याची अपेक्षा समाज म्हणूनच ठेवून असतो.
शब्दांकनः मनिषा पांढरे( माळेवाडी अकलूज)
———–––———————————————————–
सुधीर नाचणे एक उत्साही तंत्रस्नेही केंद्रप्रमुख, एक हाडाचा शिक्षक, शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वतः मार्गदर्शन करणारा हुशार बुध्दिमान शिक्षक. त्यांच्यामध्ये शिक्षक हा ओतप्रोत भरलेला आहे.
शब्दापेक्षा कृतीस महत्त्व देणारा. समर्पणाची शुध्द भावना असली की प्रगती ही होतेच हे सुधीर नाचणे यांचे बाबतीत चौकटीत बसणारे आहे.
गटशिक्षणाधिकारी श्री. धनंजय देशमुख माळशिरस
——————————————–——————————–
श्री नाचणे सर यांनी केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती झालेपासून केंद्रस्तरावर विध्यार्थी व शाळा गुणवत्तापूर्ण होणे कामी विशेष उपक्रम राबविले. सर्वाना विश्वासात घेऊन लाभार्थी योजना अंमल बजावणी केली. विविध प्रशिक्षणात विशेष सहभाग असायचा. उपक्रमशील केंद्र म्हणून केंद्राची नोंद तालुकास्तरावर झाली. विषयज्ञान चांगले. तंत्रस्नेही शिक्षकांना अचूक मार्गदर्शन. प्रशासनाशी नेहमी सहकार्याची भूमिका असणे. सडेतोड बोलणे. इ.बाबी त्यांचेकडे दिसून आल्या आहेत. सेवानिवृत्तीनंतर च्या पुढील काळात चांगले आरोग्य लाभावे. कौटुंबिक जीवन सुखा समाधानाचे जाओ. हीच शुभेच्छा…!!!!!.
महालिंग नकाते विस्तारधिकारी माळशिरस