एक मे महाराष्ट्र दिन. कोरोना विषाणू ची साखळी तोडण्यासाठी, यावर्षी 61 वा महाराष्ट्र दिन आपण सर्वजण घरात बसूनच साजरा करत आहोत. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐
मंगल देशा ,पवित्र देशा, महाराष्ट्र देशा||
प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा||
अशा शब्दात गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांनी महाराष्ट्राचे वर्णन केलेले आहे. या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास भारताच्या इतिहासातील अभूतपूर्व ,रोमांचकारी असाच आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, संपूर्ण भारतात भाषावार प्रांतरचना करण्यात आली, पण महाराष्ट्र मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत होता. फजल अली यांच्या नेतृत्वाखाली नेहरू सरकारने समिती गठीत केली. या समितीने गुजरात व महाराष्ट्र या द्विभाषिक राज्याची राजधानी मुंबई राहील, असा अहवाल दिला. त्यावेळी सारा महाराष्ट्र खडबडून जागा झाला. संपूर्ण महाराष्ट्र आंदोलनाने पेटून उठला. या आंदोलनाचे नेतृत्व सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, प्र. के. अत्रे, भाई डांगे अशा कितीतरी व्यक्तींनी केले. नवयुग साप्ताहिकातून व आपल्या भाषणातून प्र. के. अत्रे यांनी आपल्या लेखणीने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये चैतन्य निर्माण केले.1 मे 1960 ला मराठी भाषा बोलणाऱ्या, मराठी माणसांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली. महाराष्ट्राची जबाबदारी कृष्णाकाठ रचित यशवंतराव चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली.
महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र.
ही महाराष्ट्रभूमी म्हणजे रत्नांची खाणच. मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र संभाजी महाराज, अटकेपार मराठ्यांचा झेंडा फडकविणारे पहिले बाजीराव पेशवे आमच्या महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्र संतांची भूमी. ज्ञानाची माऊली- साऱ्या विश्वासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर ,संत शिरोमणी नामदेव, संत एकनाथ ,जगद्गुरु संत तुकाराम याच मातीत जन्मले. अभंग, भारुड, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श शिकवण राजनीतीचा अवलंब करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळक, सावरकर, सेनापती बापट, दलितांचे कैवारी -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले, स्त्री शिक्षणाचे जनक- प्रणेत्या- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, स्वर सम्राट पंडित भीमसेन जोशी, ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवले गेलेले साहित्यिक वि. स. खांडेकर ,विंदा करंदीकर ,वि. वा. शिरवाडकर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, समाजकार्यात स्वतःला वाहून घेणारे सिंधुताई सपकाळ, बाबा आमटे, प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे सहकारमहर्षी वसंतदादा पाटील अशा कितीतरी थोर रत्नांचा जन्म या मातीतलाच. त्यांच्या अलौकिक असामान्य कार्याचा कर्तबगारीचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे.
महाराष्ट्र म्हणजे दऱ्या खोऱ्यांचा प्रदेश. सह्याद्रीच्या डोंगर रांगा, दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या पवित्र नद्या, अजिंठा-वेरूळ सारखी अप्रतिम प्राचीन लेणी, ऐतिहासिक महत्त्व असलेले छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड किल्ले, विद्येचे माहेरघर सांस्कृतिक राजधानी असणारे पुणे, देशाची आर्थिक राजधानी मुंबई, निसर्गाने नटलेला फुललेला, संपन्न असा कोकण .असा हा माझा महाराष्ट्र . असा हा माझा महाराष्ट्र व मी महाराष्ट्रीयन याचा मला गर्व वाटतो.
महाराष्ट्राचा देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक, लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक, राज्य फुल ताम्हण, फळांचा राजा आंबा ,राज्य प्राणी शेकरू, राज्यपक्षी हरियाल, राज्यभाषा मराठी. गणेशोत्सव ,शिवजयंती, होळी, दसरा, दिवाळी हे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण उत्सव .
आज प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे .उद्योगधंदे ,शेती- पशुपालन, पर्यटन, संदेशवहन ,तंत्रज्ञान, शिक्षण साखर कारखानदारी, सहकारी क्षेत्र, सिंचन पद्धत, नृत्य ,संगीत ,नाट्य ,साहित्य, कला अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती ही दैदिप्यमान अशीच आहे. संपूर्ण भारतात महाराष्ट्राचे स्थान आगळेवेगळे वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.
बहु असोत सुंदर संपन्न की महा||
प्रिय अमुचा, एक महाराष्ट्र देश हा||
श्रीम. राणी जाधव (गाडेकर) अनु. माध्य.आश्रमशाळा फुलवडे, आंबेगाव, पुणे.