Site icon ज्ञानसंवाद

महाराष्ट्र देशा…

महाराष्ट्र दिन विशेष

१ मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन आहे. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. दक्षिण व उत्तर भारताच्या मधोमध महाराष्ट्र वसलेला असून अरबी समुद्रापर्यंत त्याच्या सीमा पसरलेल्या आहेत.

अतिप्राचीन काळापासून दक्षिण व उत्तर भारताच्या संगमाचे स्थान म्हणून महाराष्ट्र भूमी आहे असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे भारताचे एक अतिशय महत्त्वपूर्ण राज्य व देशाच्या उपराजधानीचे शहर असलेले राज्य म्हणून भारतात महाराष्ट्राचे स्थान आगळेवेगळे आहे. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, सहकार, कृषी, संगीत, विज्ञान, उद्योग, संगणक, अशा कितीतरी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन देशात व जगात महाराष्ट्राचा नावलौकिक केला आहे. याच रूपाने महाराष्ट्राला फार मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. हा प्राचीन वारसा सांभाळून भारत देशाच्या विकासातही महाराष्ट्राचे फार मोठे योगदान आहे. मग ते स्वातंत्र्यलढ्यातील असो, की सामाजिक, धार्मिक, राजकीय सुधारणांमधील असो. या मुळेच महाराष्ट्राचा इतिहास हा प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात मराठी स्वराज्य स्थापन करून आपल्या राज्यातील सर्व जनतेचे सर्वधर्मसमभावनेने पालन केले. प्रत्येकासाठी समान न्याय देऊन हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची रुजवणुक केली. त्यांच्या प्रेरणेतूनच महाराष्ट्राला आज मराठी राज्य म्हणून एक आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे वेगळेपण हे मुख्यतः मराठी भाषेमुळेच आहे. अखिल महाराष्ट्र प्रदेशात मराठी हीच लोकव्यवहाराची प्रमुख भाषा आहे. मराठी भाषेच्या गोडव्याचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात,
“माझ्या मऱ्हाटाची बोलू कवतुके, परी अमृतातेही पैजा जिंके”
असे वर्णन करून त्यांनी मराठीची थोरवी गायली आहे. ही मराठी भाषा महाराष्ट्राचा अभिमान आहे. ती महाराष्ट्राची राजभाषा आहे. परंतु महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असले तरी सर्व लोक मग ते कोणत्याही भाषेचे, धर्माचे, वंशाचे, प्रांताचे असले तरी ते महाराष्ट्रीय समाजाचे एक घटक होय. आणि ते सर्व आनंदाने व गुण्यागोविंदाने महाराष्ट्रात नांदतात. म्हणूनच महाराष्ट्र हे वैविध्यपूर्ण राज्य आहे. यासाठी या महाराष्ट्राला एकात्मतेचे, बंधुभावनेचे प्रबोधन कायम लाभत आलेले आहे. या भूमीवर समाजाला भक्तीचा मार्ग दाखविणारे अनेक संत महात्मे होऊन गेले. तसेच समाजाला विकासाचा मार्ग दाखवणारे समाजसुधारक होऊन गेले. एवढेच नव्हे तर राष्ट्राच्या रक्षणार्थ स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे शूरवीरही होऊन गेले. म्हणूनच या महाराष्ट्राच्या भूमीला भक्तीमार्गाची, त्यागाची, पराक्रमाची आणि देशप्रेमाची परंपरा लाभलेली आहे. या परंपरेमुळेच अनेकतेमध्ये एकता जपणारे हे महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीत संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा अनेक थोर संतपरंपरेने भक्तिमार्गातून जीवन मार्ग दाखवून महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचे संवर्धन केले. तर दुसरीकडे समाजातील वाईट चालीरीती, प्रथा – परंपरेतून समाजाला मुक्त करून समाजातील लोकांना एक माणूस म्हणून जगता यावे यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर समाजसुधारकांनी लोकांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी व मानवताधर्म रुजविण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले. सोबतच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजगुरु अशा अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची पर्वा केली नाही. या सर्वांच्या कार्यामुळेच आज महाराष्ट्र राज्य अभिमानाने मिरवत आहे. महाराष्ट्राच्या या मातीचे महात्म्य अनेक प्रतिभावंतांनी आपल्या शैलीने वर्णिले आहे. राम गणेश गडकरींनी महाराष्ट्राचा गुणगौरव करतांना म्हटले आहे,
“मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा”
असे हे गौरवशाली राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र होय. तर महाराष्ट्रातील मराठी भाषेचे महात्म्य वर्णन करतांना विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी
“माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा’
अशा शब्दात मराठी भाषेविषयी महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवला आहे. अशा या गौरवशाली, वैभवशाली महाराष्ट्राचा मौलिक वारसा आणि वसा कायम जपून ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवांने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे .
जय महाराष्ट्र !

निलेशकुमार रामभाऊजी इंगोले
सहायक शिक्षक
मोर्शी, जि.अमरावती
९३७११४५१९५

Exit mobile version