Site icon ज्ञानसंवाद

राष्ट्रसंतांचा स्त्री विषयक आदर्शपूजक दृष्टिकोन

राष्ट्रसंतांनी त्यांच्या अमोघ वाणीने व खंजिरी भजनाने समाजपरिवर्तनाची, ग्राम परिवर्तनाची नवी क्रांती घडवून आणली. समाजातील प्रत्येक विषयाला स्पर्शून जाणारी त्यांची विचारधारा जीवन सुलभ व सुरळीत करणारी आहे. ग्रामगीतेतून त्यांनी दिलेले मौलिक विचार समाजाला संघर्षातून मुक्त करून सर्वात्मक विकास साधणारे आहे. समाजविकासात, ग्रामविकासात असणारे अडथळे, समस्या नष्ट करण्यासाठी त्यांनी अंधश्रद्धा, निरक्षरता, स्त्री-पुरुष असमानता अशा अनेक समस्यांवर आघात करून या समस्यांतून समाजाला बाहेर काढण्यासाठी प्रबोधनात्मक विचार मांडले. स्त्री हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे. या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्त्री-पुरुष समानतेची ग्रामगीतेतून मांडणी केली. त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन आदर्शपूजक आहे.

आदर्श ग्रामनिर्मिती करीता महिलोन्नती आवश्यक आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. जे विचार विश्व त्यांनी ग्रामगीतेतून मांडले त्यामध्ये महिलोन्नती हाही एक उल्लेखनीय पैलू आहे. कुटुंबव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था यांची जडणघडण स्त्रीवर कशी अवलंबून आहे हे त्यांनी कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. स्त्री सामर्थ्य ओळखून शिक्षणाची यथार्थ दृष्टी स्त्री जीवनाला देण्याचे कार्य राष्ट्रसंतांनी केले. स्वातंत्र्यपूर्व भारतातील स्त्रियांविषयक समस्या, प्रश्न, स्त्रियांची हलाखीची स्थिती त्यांनी भजन, प्रवचन व मार्मिक भाषणांतून मांडली व स्त्री हक्कासाठी समाजजागृती केली. स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच अधिकार असावेत असे सांगणारे या भारतभूमीला लाभलेले ते महान आधुनिक संत होते. समाजपरिवर्तनाच्या कार्याला किर्तन, भजनाची जोड देत त्यांनी स्त्री- सक्षमीकरणाची गरज हिरीरीने समाजापुढे मांडली. स्त्री आपल्या जीवनात अनेक भूमिका निभावते. ती कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचा द्योतक आहे. म्हणूनच आदर्श माता म्हणून तिच्या कार्याचे वर्णन करताना राष्ट्रसंत म्हणतात,
“जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाते उद्धरी
ऐसी वर्णिली मातेची थोरी, शेकडो गुरुहुनिहि”
राष्ट्रसंत म्हणतात, ग्रामविकासाचा पाया शिक्षण आहे. या शिक्षणातून आदर्श पिढी घडविण्याचे कार्य मात्र गुरुजनांच्या हातूनच घडू शकते. परंतु माता गुरुहुनहि थोर आहे. म्हणूनच जगाचा उद्धार करण्यासाठी मातेचे स्थान महत्त्वाचे आहे. आदर्श माता घडवण्यासाठी महिलांची उन्नती आवश्यक आहे असे प्रतिपादन राष्ट्रसंत करतात. यासाठी बालवयापासूनच स्त्री शिक्षणाची सोय करून स्त्रियांच्या जीवनाचा पाया बळकट करण्यासाठी स्त्री शिक्षणाची आवश्यकता सांगताना ते म्हणतात,
“अगदी मूलवयापासोनि, उत्तम चालीरीतींची राहणी
कार्यी चपल सावध जीवनी, शिक्षण देवोनि करावी”
एक सुसंस्कृत व किर्तीमान समाज घडविण्यासाठी अगदी लहान वयापासून मुलींना चपळतेचे ज्ञान देऊन, उत्तम चालीरीती शिकवुन सक्षम करण्यासाठी स्त्री शिक्षणाची गरज राष्ट्रसंतांनी मांडली. ज्याकाळात काही अनिष्ट रूढी-परंपरांमुळे भारतीय समाजातील स्त्रियांचा राहणीमानाचा दर्जा खालावत चाललेला होता, स्त्रियांचे घराबाहेर पडणे सुद्धा बंद झाले होते, तिचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढेच बंदिस्त झाले होते तेव्हा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या ब्रिटिश कालखंडात स्त्री जीवनात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. याच काळात तुकडोजी महाराजांनी स्त्रियांना बंधमुक्त करण्याचा विचार मांडला. स्त्री सक्षम झाली पाहिजे, स्वतःचे संरक्षण स्वतः करू शकली पाहिजे यासाठी स्त्रियांना शारीरिक शिक्षण दिले पाहिजे. त्यातूनच स्त्रियांमध्ये धैर्य, आत्मविश्वास निर्माण होऊन स्वतःच्या रक्षणार्थ लढण्यास त्या समर्थ होतील व समाजाची प्रगती होईल. याविषयी राष्ट्रसंत म्हणतात,
“काही मुली शक्ति – शिक्षण घेती, मुलांपेक्षाहि धीट असती
नाही गुंडांचीहि छाती, हात घालील त्यांचेवरि”
आपल्या कार्यातून जीवन शिक्षणाच्या माध्यमातून महाराजांनी पाकशास्त्राचे शिक्षण महिलांना दिले. बालसंगोपन, उद्योग शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचे आटोकाट प्रयत्न तुकडोजी महाराजांनी केले. महिलांकरिता शारीरिक शिक्षणाचे धडे देऊन स्वसंरक्षणासाठी प्रेरित केले. श्री गुरुदेव महिला मंडळ स्थापन करून व स्त्रियांना संघटित करून त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला. महिला संघटनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून स्त्रियांना अभिव्यक्तीची संधी मिळवून दिली. याच महिलांनी पुढे राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला. अशाप्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री सक्षमीकरणाचे भक्कम कार्य राष्ट्रसंतांनी केले. तुकडोजी महाराज प्राचीन संस्कृतीचे अभ्यासक होते. परंतु त्यांची विचारधारा आधुनिक विचारांशी जुळलेली होती. अध्यात्माच्या जोडीला वाणी आणि लेखणी तसेच शक्ती आणि भक्तीच्या सर्व सामर्थ्यानिशी त्यांनी समाजजागृतीचे कार्य केले. त्यात समाजजागृतीचा महत्त्वाचा पैलू महिलोन्नतीच्या कार्याला विशेष प्राधान्य देऊन त्यांनी स्त्री जीवन सुकर केले.

राष्ट्रसंतांनी त्यांच्या विचारातून महिला उन्नती, समाज उभारणीत स्त्रियांचे महत्व, राष्ट्रीय कार्यात स्त्रियांचे योगदान, स्त्री सक्षमीकरणाचे महत्त्व, आदर्श माता म्हणून स्त्रीचे महत्व, स्त्री-पुरुष समानतेची गरज, स्त्री शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले. राष्ट्रसंतांचा स्त्री-विषयक दृष्टिकोन सुदृढ समाज घडविण्यात तसेच स्त्री सक्षमीकरणाची पायवाट सुकर करण्यास उपयुक्त ठरला. आजही त्यांचे विचार स्त्री जीवनाला सक्षम करण्यासाठी फार उपयुक्त व मोलाचे आहेत. आजच्या काळात एकीकडे स्त्री-सक्षमीकरण होत असतांना स्त्री मात्र अनेक अत्याचार, अन्यायांनी वेढलेली आहे. म्हणून तिच्यावर होणारे हल्ले परतविण्यासाठी तिने स्व-संरक्षणाचे शिक्षण घेऊन सक्षम झाले पाहिजे. स्वतःच स्वतःची रक्षक होऊन लढले पाहिजे. मग कोण्या गुंडाची तिच्या काळजाला हात घालण्याची हिंमत होणार नाही हे राष्ट्रसंतांचे विचार आजही स्त्री सुरक्षिततेसाठी व स्त्री सक्षमीकरणासाठी गरजेचे व मार्गदर्शक आहे. स्त्री जीवनाला समानतेच्या दृष्टीने पाहणाऱ्या, स्त्रीयांना उद्योग संघटनेचे बळ देऊन स्त्रियांच्या पंखात शक्तीची भरारी पेरणारे तसेच स्त्रीविषयक आदर्शपूजक दृष्टिकोन ठेवणारे थोर आध्यात्मिक संत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना माझे विनम्र अभिवादन!

राजश्री शेषरावजी खाजोने
सहायक शिक्षिका
चांदूरबाजार जि.अमरावती

Exit mobile version