बालभारतीच्या वतीने दरमहा प्रकाशित होणाऱ्या किशोर’ या मुलांच्या लाडक्या मासिकाचे हे ५० वे वर्ष आहे. मागील ५० वर्षात ‘किशोर ने महाराष्ट्राच्या वाचनसंस्कृतीची वाढ होण्यास मोठा हातभार लावला आहे. मुलांना अवांतर वाचानची गोडी लागावी, त्यांना अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, विविध मूल्यांचे संस्कार व्हावेत हा हेतू ठेवून हे मासिक प्रकाशित केले जाते. किशोर च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पाठ्यपुस्तक मंडळाने वार्षिक वर्गणी फक्त ५० रूपये करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्यतल्या सामान्य व्यक्तीला अंक विकत घेणे परवडावे, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना पोहचावा हा यामागील हेतू आहे. अवध्या ५० रूपयात आता हे मासिक वर्षभर दरमहा पोस्टाने घरपोच मिळू शकणार आहे.
या निमित्ताने मी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांना नम्र आवाहन करतो की, आपल्या मुलांना ही पुस्तकरुपी अमूल्य भेट दया. लहाणपणी वाचलेली एक गोष्ट आपल्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. मुलांच्या मनाला आनंदित करणारं साहित्य त्यांच्या भावनिक, बौद्धिक, वैचारिक विकासासाठी आवश्यक असतं. कोवळ्या आणि सर्जनशील मनाची मशागत करण्याचे महत्त्वाचे काम हे मासिक करू शकते. मुलांच्या सर्वांगाने फुलण्याच्या काळात त्यांना नक्कीच किशोर ची मदत होऊ शकेल. मी सर्व शिक्षक मित्रांना आवाहन करतो की आपण विद्यार्थी आणि पालकांमध्ये ‘किशोर’ बद्दल जागृती निर्माण करावी. वर्गणी भरण्यास त्यांना मदत करावी. आता मोबाईलवरून अगदी सहजपणे वर्गणी भरणे शक्य आहे. हा ठेवा घरोघरी जाऊ दया. वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी सर्वांनी आपापला वाटा उचलूया. सहकार्याच्या अपेक्षेसहित धन्यवाद.
वर्गणीसाठी :
या वेबसाईटला भेट दया.
मोबाईलवरून kishor Masik हे अॅप डाऊनलोड करा.
मनीऑर्डर किंवा डीडी पुढील पत्त्यावर पाठवा.
संपादक, किशोर, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती,
पुणे ४११००४.