Site icon ज्ञानसंवाद

आश्रम शाळेच्या हजारो शिक्षकांनी दि. 5 सप्टेंबरला पाळला निषेध दिन

आज दि-५/०९/२०२३रोजी (शासनमान्य) आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, नाशिक व संलग्नित आदिवासी विकास विभाग अनु.आ.शा.कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य नाशिक या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळांना लागू केलेल्या अशैक्षणिक आणि अन्यायकारक शालेय वेळापत्रकाच्या विरोधात आज शिक्षकदिनी महाराष्ट्रातील सर्व आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांनी काळी फीत बांधून निषेध नोंदवला आहे.
आदिवासी विकास विभागातील लाखो आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळेतील हजारो शिक्षक खात्यामार्फत होणाऱ्या विविध प्रकारच्या अन्याय अत्याचाराला सतत तोंड देत आहेत. शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळेत कार्यरत शिक्षक कर्मचारी हे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय पातळीवर अतिशय असमाधानी असून विविध पातळ्यांवर त्यांना सतत अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि शोषणाला सामोरे जावे लागत आहे. मा.आदिवासी विकास मंत्री यांनी नुकतेच आश्रम शाळेचे वेळापत्रक बदलल्यामुळे सर्व कर्मचारी आणि आदिवासी विद्यार्थी या चुकीच्या वेळापत्रकामुळे त्रस्त झाले आहेत. मंत्री महोदय मात्र हट्टाला पेटले असून आश्रम शाळेतील अर्धवट इमारती, अपूर्ण निवास व्यवस्था, अपुरे व ना दुरुस्त शासकीय निवासस्थाने, अपुरी शौचालये व स्नानगृहे, संसाधनांची कमतरता याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून या उणीवांचा अनिष्ट परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आणि अभ्यासावर होत आहे. आश्रम शाळेतील भौतिक सुविधा देतांना, “त्यांचा तो हक्क आहे” असे न बघता “त्यांच्यावर उपकार करीत आहोत” या भावनेने क्वेस्ट सारख्या तथाकथित बुद्धिजीवी संस्था शासनाच्या सल्लागार झाल्या आहेत. तर मंत्री गेली 20 वर्षे वेळापत्रकाचा मुद्दा घेऊन “राज हट्ट” करीत आहेत.
शासनाने कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या वेळेस स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शिक्षकाची निवड केली असून आता मात्र त्यांची गुणवत्ता तपासण्याची शासनाला निकड कां भासली ? हे अनाकलनीय आहे. याचा अर्थ पूर्वीची निवड प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने केली गेली होती असे समजायचे काय? आपल्याच खात्यातील मनुष्यबळाच्या गुणवत्तेवर संशय घेऊन दर तीन महिन्याला शिक्षकांची परीक्षा घेऊन अपमानित करण्याचा शासनाचा हेतू हा निषेधार्ह आहे

तद्वतच दहावी/बारावीच्या निकालावरून शिक्षकाच्या वेतनवाढी रोखण्याचा ईशारा म्हणजे तुघलकी कारभाराची सुरुवात असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.

ही सर्व परिस्थिती सरकारच्या लक्षात यावी म्हणून आदिवासी विकास विभागातील सर्व शिक्षकानी दिनांक 5 सप्टेंबरला शिक्षक दिन हा शिक्षकांचा छळ करणाऱ्या मंत्र्यांच्या राजहट्टा विरोधात शासकीय व अनुदानित आश्रम शाळेच्या हजारो शिक्षकांनी दि. 5 सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे . त्याचप्रमाणे काळ्या फिती लावून काम केले असल्याबद्दलची निवेदनं मा.मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व मा.आदिवासी विकास मंत्री यांना ई-मेल द्वारा पाठविण्यात आले आहे
महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या भावना शासन समजून घेणार नसेल तर नजीकच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रव्यापी जन आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे, अशी माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राऊत यांनी दिली आहे.

          

आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक.

Exit mobile version